पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन धान्य वाटपाला सुरुवात झाली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपले धान्य घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोमवारी वगळता सर्व दिवशी हे धान्य वितरित केले जाणार आहे.
शहरातील निगडी, पिंपरी आणि भोसरी या तीन परिमंडळांतील एकूण २५३ रेशन दुकानांमधून हे वाटप सुरू आहे. यामध्ये ‘अ’ झोनमध्ये ९०, ‘ज’ झोनमध्ये ७७, तर ‘फ’ झोनमध्ये ८६ दुकानांचा समावेश आहे. शहरात ३,७१० ‘अंत्योदय’ शिधापत्रिकाधारक आणि ८८,६४१ ‘अन्न सुरक्षा’ योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक आहेत. या दोन्ही गटांतील एकूण ४,८९,३८७ लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यासाठीचे धान्य दिले जाणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून १०० टक्के धान्यसाठा उपलब्ध आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही घाई न करता वेळेत धान्य घ्यावे. कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार गहू आणि तांदूळ दिले जात आहे. आता शिधापत्रिका ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक करण्यात आले असून, यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
धान्य घेताना संबंधित लाभार्थ्याने स्वतः उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिधापत्रिका आणि आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. ‘ज’ झोनचे प्रमुख प्रदीप डंगारे यांनी धान्यसाठा पूर्णपणे उपलब्ध असल्याचे सांगून, नागरिकांनी ३० सप्टेंबरपर्यंत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































