खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळील चावणी रस्त्यावर खैर जातीच्या लाकडांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच खालापूर वनविभागाने सापळा रचला आणि मोठी कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पीकअप टेम्पोत खैराची लाकडे भरताना चालक रुपेश विनायक पवार (वय 34, रा. वनवशी ता. दापोली, जि. रत्नागिरी) याला रंगेहात पकडण्यात आले. तर काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पुढील चौकशीत आरोपी राम शिवाजी पवार, किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दीपक जाधव आणि ऋतिक शशिकांत पवार (रा. दापोली, जि. रत्नागिरी) यांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले.
या कारवाईत वापरलेला पीकअप (MH 08 AP 8376) आणि युनिकॉन मोटारसायकल (MH 06 AV 0107) जप्त करण्यात आली असून सुमारे ₹9.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, खालापूर येथे हजर केले असता त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईचा तपास उपवनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील आणि सहायक वनसंरक्षक सागर माळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यामध्ये खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, उंबरे वनपाल सुभाष राठोड, खोपोली वनपाल भगवान दळवी, चिलठण वनपाल संजय पगारे, तसेच वनरक्षक अतुल ओव्हाळ, मयूर निकम, नितीन कराडे, अंकुश केंद्रे, चंदन नागरगोजे, पांडू घुटे, गोरक्ष दहिफळे, बालाजी सूर्यवंशी आणि राजाराम पारधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यूज अनकट प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे, खोपोली












































