पुणे महानगर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ (PMRDA) प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकताच आकुर्डी येथे अधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी भूसंपादन आणि मोजणीचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रस्तावित रिंग रोड चार टप्प्यांमध्ये विभागलेला असून, पहिल्या टप्प्यातील सोलू ते निरगुडी या तीन गावांमधील भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. यावेळी, संबंधित शेतकऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन त्यांना एफएसआय (FSI) आणि टीडीआर (TDR) देण्याबाबत चर्चा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
यासोबतच, हिंजवडी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या भूसंपादनाची माहितीही या बैठकीत घेण्यात आली. नवले उड्डाणपुलाजवळील वाहतूक व्यवस्थापनासाठी भूसंपादन, जलवाहिनीचे स्थलांतर आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याची कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून काम करण्याची गरज असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे












































