पालिकेने नंबर दिला, पण अधिकाऱ्याचा दावा ‘नाहीच’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक म्हणून नुकतीच रुजू झालेल्या किशोर गोखले यांनी पालिकेने अद्याप अधिकृत मोबाईल नंबर दिला नसल्याचा दावा केला आहे, मात्र दूरसंचार विभागाने हा दावा फेटाळला आहे. गोखले यांना ऑगस्टमध्येच नवीन सिम कार्ड आणि मोबाईल नंबर देण्यात आल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिकेने शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) जाहीर केला असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत. यासंदर्भात नागरिकांना अनेक प्रश्न आहेत आणि ते गोखले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गोखले आपला खाजगी फोन उचलत नाहीत आणि अधिकृत नंबर मिळाला नसल्याचे खोटे कारण सांगत नागरिकांशी संवाद टाळत आहेत, असा आरोप होत आहे.

एका बाजूला शहराच्या महत्त्वाच्या विषयावर नागरिकांना अधिकाऱ्याशी संवाद साधायचा आहे, तर दुसरीकडे अधिकारी संपर्क टाळत असल्याचे चित्र दिसत आहे.

या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता महेश कावळे यांनी गोखले यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मोबाईल नंबर देण्यात आल्याचे सांगितले आहे. हा विरोधाभास पाहता, गोखले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे