पुणे: जून २०१७ मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. यानंतर अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने पहिल्या टप्प्यांची मेट्रो सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी तीन डब्ब्यांची मेट्रो सुरु करण्यात येईल. यासाठी मेट्रोचे सहा कोच आज पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. यावेळी मेट्रोचे डबे देखील पुण्यात पहिल्यांदा आणण्यात आले. अनेक पुणेकर मेट्रोचे डबे पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. यावेळी कामगारांनी ढोलताशे वाजवून डब्यांचे स्वागत केले.
दरम्यान या मेट्रो कोचच्या पूजनावरून नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समजले आहे. दरम्यान, स्वारगेट ते पिंपरी या टप्प्यातील पिंपरी ते दापोडी मेट्रोमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुरवातीला ३ डब्यांची मेट्रो धावणार आहे. यासाठी मेट्रोचे सहा कोच आज पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. मेट्रो ट्रेनमधून एकावेळी ९५० प्रवाशी प्रवास करु शकतील. मेट्रो ट्रेनचा कमाल वेग ९० किलोमीटर प्रतितास इतका असेल. तसेच मेट्रोत मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल.
पुणे मेट्रोच्या महामेट्रोद्वारे बांधण्यात येणार्या दोन मार्गिकांसाठी ₹ ११,५२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे, ज्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका मिळून १०%, तर केंद्र व राज्य शासन प्रत्येकी २०% निधी उपलब्ध करतील, उर्वरित ५०% निधी हा कर्जाद्वारे उभा केला जाईल. राज्य शासनाच्या २०% वाट्यात भूसंपादनाचा समावेश आहे.