श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटींची मदत

सुवर्णयुग सहकारी बँकेकडूनही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तर, सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. बळीराजावर आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात पुढे करत राज्याच्या पुनर्वसन प्रयत्नांना साथ दिली आहे.

मुंबई येथे या मदतीचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी आणि तुकाराम रासने आदी मान्यवर उपस्थित होते.

या सामाजिक कार्यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे