पुण्यात महायुतीत वाढला तणाव! रवींद्र धंगेकर आणि भाजप नेत्यांमध्ये संघर्ष तीव्र

पुण्यामध्ये महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुंड निलेश घायवळ प्रकरणानंतर आता शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर जैन बोर्डिंगच्या जमिनीबाबत धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपवर टीका सुरूच ठेवली आहे. जैन बोर्डिंगची जमीन मुरलीधर मोहोळ यांनी हडप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केल्यानंतर पुण्यात महायुतीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या सततच्या आरोपांनंतर आता त्यांच्यावर शिवसेनेकडून कारवाई होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजप नेत्यांनी धंगेकर यांची तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी युती वाचवण्यासाठी कारवाईचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे यांनी पूर्वीच धंगेकर यांना “महायुतीमध्ये दंगा नको” असे जाहीरपणे सांगितले होते. तरीही धंगेकरांनी भाजप नेत्यांवर टीका थांबवली नाही.

भाजपने असा आरोप केला आहे की, रवींद्र धंगेकर हे महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेले आहेत आणि त्यांना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत “हँडल” करत आहेत. या आरोपांवर धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर आजवर शिंदे साहेबांनी कारवाई केलेली नाही. भगवान महावीर मंदिर आणि जैन बोर्डिंगच्या जमिनीवरील व्यवहार रद्द होईपर्यंत माझा लढा सुरू राहील. कितीही कटकारस्थानं झाली तरी मी मागे हटणार नाही,” असे धंगेकर यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “समाजात चुकीच्या घटना घडत असतील, तर त्यावर एक जागृत पुणेकर म्हणून नक्की बोला. खरा कार्यकर्ता तोच, जो चांगलं-वाईट ओळखून शहरासाठी उभा राहतो. सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, त्यानंतरच पक्ष किंवा युती,” असे धंगेकर म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या तंबी असूनही धंगेकर आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे हा वाद आता थेट राज्यातील महायुतीच्या एकतेवर परिणाम करणार का, की शिवसेना धंगेकर यांच्यावर खरोखरच कारवाई करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील