शिवसेनेतील संघर्ष टोकाला: रवींद्र धंगेकर यांनी मोहोळवर उघडले २ महत्त्वाचे प्रकरणे

पुण्यामध्ये सध्या शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर रोज नवनवीन आरोप करत एकच खळबळ उडवून देत आहेत.

जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर, धंगेकर यांनी आता पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर नवा बॉम्ब टाकत “जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटूयात” असे सांगितले आहे. या विधानामुळे हा संघर्ष आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काल मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करत म्हटले, “मला त्या माणसाबद्दल आता परत बोलायचं नाही. त्याचे अनेक प्रकरण बाहेर येत आहेत. २०११ मध्ये याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे. कोथरूडमध्ये जमीन बळकवली होती, जामीन न घेता तो पळाला होता. या माणसावर १० गुन्हे आहेत, माझ्यावर १ गुन्हा दाखवा.”

मात्र, मोहोळ यांनी “माझ्यावर एकही गुन्हा नाही” असे म्हटल्यावर रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची पानं समोर आणली आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी प्रकट केली.

धंगेकर म्हणाले, “अतिशय सुसंस्कृत आणि सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी आहे. त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, ते कशाकशा संदर्भात आहेत, अगदी ऍट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मोहोळ यांच्यावर दाखल आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात, काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर १३ केसेस आहेत, आणि त्यांच्यावर एकही नाही, असे बोलताना आपण प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांचीही फसवणूक करत असतो. हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे.”

रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा सांगितले की, “बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटूयात.” त्यामुळे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील हा संघर्ष आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील