पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची घडी अधिक मजबूत करण्यासाठी, वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल जलद गतीने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ आता ‘हाय-टेक’ होणार आहे! पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव सादर केला असून, यामुळे पोलिसांची ‘डिजिटल नजर’ अधिक प्रभावी होणार आहे.
शहरात सध्या महापालिका आणि ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिकेकडे आहे. यामुळे ‘व्हीआयपी मूव्हमेंट’ किंवा तत्काळ माहिती मिळवताना पोलिसांना अनेकदा महापालिकेच्या ‘कमांड अॅण्ड कंट्रोल रूम’वर अवलंबून राहावे लागते. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि पोलिसांना ‘रिअल-टाइम सीसीटीव्ही फीड’ उपलब्ध व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल केला जात आहे.
या योजनेअंतर्गत, सीसीटीव्ही यंत्रणा तीन टप्प्यांमध्ये ‘स्मार्ट’ केली जाणार आहे
- इंटिग्रेशन: महापालिकेच्या अखत्यारितील आवश्यक कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांना हस्तांतरित करणे.
- अपग्रेडेशन: जुने आणि नादुरुस्त कॅमेरे बदलून त्यांच्या जागी उच्च दर्जाचे, ‘नाइट व्हिजन’ आणि ‘एआय-बेस्ड’ (Artificial Intelligence) कॅमेरे बसवणे.
- इन्स्टॉलेशन: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भागात, औद्योगिक वसाहतीत आणि पालिका हद्दीबाहेरील परिसरात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे.
आयुक्तालय हद्दीत नागरीकरण वेगाने वाढत असल्याने तांत्रिक सज्जता आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी कॅमेऱ्यांचे सर्वेक्षण, नादुरुस्त कॅमेऱ्यांची ओळख, नवीन ठिकाणांची निवड आणि नियंत्रण हस्तांतरणासाठी सल्लागार कंपनी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ‘डिजिटल व्हिजिलन्स’मुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि गुन्हेगारी हालचालींवर तत्काळ प्रतिसाद देणे पोलिसांना शक्य होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































