पिंपरीत महायुतीला धक्का देण्यास राष्ट्रवादी-शिवसेना सज्ज!

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकेकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जाणारे प्राधिकरण, निगडी, आकुर्डी आणि चिंचवडगावचे काही भाग आता महाविकास आघाडीच्या जोरदार तयारीमुळे चर्चेत आले आहेत.

महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान

भाजप स्थानिक पातळीवर माजी उपमहापौर हिरा (नानी) घुले, सुजाता पालांडे यांच्यासह प्रभावी नेत्यांची मजबूत फळी असली तरी, महायुतीने (भाजप-शिवसेना शिंदे गट) महापालिका निवडणूक एकत्रित लढल्यास बंडखोरी फोफावण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य मिळाले असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विस्तृत आणि मिश्र सामाजिक रचनेच्या या मतदारसंघात ही परिस्थिती बदलू शकते.

मविआची संघटनात्मक ताकद वाढली

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शहराध्यक्ष योगेश बहल आणि राजू मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी दिली आहे. यासोबतच, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत (थर) यांचेही आव्हान कायम आहे.
या समीकरणात माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी उडी घेतल्याने भाजपविरोधी आघाडी अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्यासोबत असलेले माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा प्रभावही महत्त्वाचा ठरणार आहे.

बनसोडे यांचा करिष्मा टिकणार?

२०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १३, राष्ट्रवादीचे १२, तर शिवसेनेचे ३ नगरसेवक निवडून आले होते. सध्या विधानसभा उपाध्यक्ष असलेले अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी टिकून असली तरी, ते विधानसभेसारखा करिष्मा दाखवणार की फक्त मुलाला निवडून आणण्यात समाधान मानणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पिंपरी मतदारसंघात उच्चभ्रू मतदारांसोबतच झोपडपट्टी आणि कामगार वर्गातील मतदारांचा मोठा समावेश असल्याने, भाजपचे संघटनात्मक बळ आणि राष्ट्रवादी-शिवसेनेच्या (ठाकरे गट) नव्या मैत्रीचे परिणाम या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येतील. पिंपरीतील लढत आता स्पष्टपणे ‘आघाडी विरुद्ध युती’ अशी झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे