पोस्ट ऑफिस आता थेट खिशात! ‘डाक सेवा २.०’ ने नागरिकांची धावपळ थांबवली

भारतीय टपाल खात्याने (India Post) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती घडवली आहे. पोस्टाच्या सर्व महत्त्वाच्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ‘डाक सेवा २.०’ हे नवीन आणि अत्यंत उपयुक्त मोबाइल ॲप १३ नोव्हेंबरपासून लाँच करण्यात आले आहे. यामुळे टपाल कार्यालयाच्या लांबच लांब रांगा, किचकट फॉर्म भरणे आणि कागदपत्रांची धावपळ करण्यापासून नागरिकांची पूर्णपणे मुक्तता झाली आहे.

या ॲपमुळे पोस्टाच्या सेवा खऱ्या अर्थाने तुमच्या ‘खिशात’ आल्या आहेत. पिंपरी पोस्टचे जनसंपर्क अधिकारी काळुराम पारखी यांच्या मते, या सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. हे ॲप इंडिया पोस्टच्या आयटी २.० उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो पोस्टल नेटवर्कचे डिजिटल रूपांतर करत आहे.
या ॲपवर उपलब्ध असलेल्या प्रमुख सुविधा खालीलप्रमाणे आहेत

  • पार्सल ट्रॅकिंग: स्पीड पोस्ट किंवा पार्सलची सद्यस्थिती त्वरित तपासता येते.
  • मनी ऑर्डर: पोस्टात न जाता मोबाईलवरून मनी ऑर्डर सहज पाठवता येते.
  • स्पीड पोस्ट फी कॅल्क्युलेटर: वेगवेगळ्या सेवांसाठी लागणारे नेमके शुल्क लगेच कळते.
  • पीएलआय/आरपीएलआय पेमेंट: पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे हप्ते भरणे झाले सोपे.
  • तक्रार व्यवस्थापन: तक्रार नोंदणी करणे आणि तिची स्थिती तपासणे आता शक्य आहे.
  • डिजिटल बुकिंग: पार्सल बुकिंग, पोस्टेज दर आणि इतर सर्व सेवा एकाच ॲपमध्ये उपलब्ध आहेत.

एवढेच नाही, तर पत्त्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी खास डिजिटल कोड देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे टपाल वितरणात गती आणि अचूकता येईल. पोस्टाच्या सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचे सर्व व्यवहारही घरबसल्या करता येणार आहेत, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे