ऑर्किड ग्रुपची व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड कायम

व्हेरॉक उद्योग समूहातर्फे गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या १७व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने दमदार खेळ करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. सलग दोन सामन्यांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्रेम कासुरेने दोन्ही वेळा सामनावीराचा मान पटकावला.

ऑर्किड ग्रुप आणि गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यातील लढत पूर्णपणे एकतर्फी ठरली. गायकवाड ग्लोबलला १७.१ षटकांत केवळ ७२ धावांवर रोखत ऑर्किडने सामन्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर ऑर्किडच्या सलामीवीरांनी फक्त ४.५ षटकांत बिनबाद ७२ धावा करत दहा विकेटने विजय मिळवला. या सामन्यात स्वयंम वाघमारेने १५ चेंडूत ४० धावांची आतषबाजी केली. त्यात एक चौकार व पाच भक्कम षटकारांचा समावेश होता. प्रेम कासुरेने १६ चेंडूत २८ धावा ठोकत पाच चौकार व एक षटकार लगावला. तन्मयने दोन चौकारांसह १२ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीतही प्रेम कासुरेने अष्टपैलू कामगिरी करत १० धावांत तीन बळी टिपले. साईराज आखाडे आणि अभिषेक घटविसवे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

यापूर्वी झालेल्या सामना मध्ये ऑर्किड स्कूलने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत एक बाद २०० धावा करत प्रतिस्पर्ध्यांवर धावांचा डोंगर उभारला होता. त्या लढतीतही प्रेम कासुरेच सामनावीर ठरला होता.

सलग दोन सामन्यांतील दमदार प्रदर्शनामुळे ऑर्किड ग्रुपने स्पर्धेतील विजेतेपदाच्या दावेदारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गजानन राऊत