महाराष्ट्राच्या २९ महानगरपालिकांचा महापौर कोण? २२ जानेवारीला आरक्षणावर निर्णय

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसह राज्यातील प्रमुख शहरांचे महापौरपदाचे भवितव्य या सोडतीवर अवलंबून राहणार आहे.

नुकतंच नगर विकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार महापौरपदाच्या प्रक्रियेसाठी राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता पार पडेल. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सोडती चिठ्ठ्या टाकून काढल्या जाणार आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदवली जाईल. यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आरक्षण प्रवर्ग

महापौरपदासाठी पुढील प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे:

अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती महिला

अनुसूचित जमाती (ST) आणि अनुसूचित जमाती महिला

इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि OBC महिला

सर्वसाधारण महिला (General Women)

खुला प्रवर्ग (Open)

महत्त्वाचे मुद्दे

मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये महापौरपदासाठी सर्व पक्षांनी सत्तास्थापनेसाठी तयारी केली आहे.

महापौरपदाचे आरक्षण मनासारखे सुटले तरच इच्छुक नेत्यांचा मार्ग मोकळा होईल.

खुला प्रवर्ग जाहीर झाल्यास राजकीय खेळी टोकाला जाईल, तर महिला प्रवर्गासाठी आरक्षित पद असल्यास काही पुरुष नेत्यांना मागे हटावे लागेल.

राजकीय गणिते बदलण्याची शक्यता

निवडणुकीत बहुमत मिळवले तरी महापौरपदाचे आरक्षण विरोधात गेले, तर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत अपक्ष किंवा मित्रपक्षांच्या उमेदवारांची मदत घेणे आवश्यक ठरते. प्रशासकीय पातळीवर सोडतीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, महापालिकांच्या आयुक्तांना या सोडतीचा अहवाल तातडीने कळवण्यात येणार आहे.

– अंकुश जाधव