कोल्हापुरात महिलांचे आंदोलन चिघळले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, या मागणीसाठी महिलांनी गांधीनगरजवळ असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावर जल आंदोलन पुकारले आहे.शुक्रवारी(दि.३) रोजी खासदार धैर्यशील माने हे या आंदोलक महिलांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांच्यासमोरच काही आंदोलक महिलांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

यंदाच्या वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातल्या महिलांचे संसार उघड्यावर पडले, शेती उद्धवस्त झाली मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे या महिलांना त्यांचं ते कर्ज फेडणं शक्य झालं नाही. शेतकऱ्यांना जशी कर्जमाफी मिळाली तशीच कर्जमाफी आम्हालाही मिळावी अशी मागणी या महिलांनी केली. त्यासाठी बचत गटाच्या महिला पंचगंगा नदीच्या काढावर आंदोलनाला बसल्या होत्या. त्याच दरम्यान महिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या महिलांची भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले होते. माने हे महिलांशी चर्चा करत असतानाच संतप्त झालेल्या काही महिलांनी थेट नदीपात्रातच उड्या घेतल्या. कर्जमाफी द्या नाही आम्ही नदीच्या पाण्यात जीवाचं बरं वाईट करतो असं त्या सांगत होत्या. महिलांच्या या पावित्र्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. खासदार माने यांच्यासह तिथं असलेल्या पोलीस आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

यावेळी उपस्थित पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. खासदार धैर्यशील माने स्वत:ही पाण्यात उतरुन आंदोलक महिलांना बाहेर येण्याचं आवाहन करत होते. शिवाय पोलिसांनीही पाण्यात उतरुन महिलांना नदीबाहेर आणलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा