लीबिया (वृत्तसंस्था) : लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २८ जण ठार झाले आहेत तर अन्य ३७ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असल्याचा दावा लिबियाच्या आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे . जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत आरोग्य खात्याचे प्रवक्ते मालेक मेरसेट यांनी सांगितले आहे की, त्रिपोलीच्या दक्षिणेकडील हबदा भागात हे हवाई हल्ले करण्यात आले. या भागात गेले महिनाभर युध्द सुरू आहे. जनरल खलीफा हिफ्टर यांच्या नेतृत्वाखाली स्वयंघोषित लिबियन राष्ट्रीय आर्मी आणि कमकुवत असणारी मात्र संयुक्त राष्ट्राचा पाठींबा असणारे सरकार यांच्यात एप्रिलपासून संघर्ष सुरू आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाठींब्यावर त्रिपोलिवर सरकार टिकवून आहे.
गेल्या आठवड्यात हिफ्टर यांनी अंतिम आणि निर्णायक लढा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या सरकारने तुर्कस्तानशी करार केला. तुर्की सैन्य या भागात तैनात करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रक्तबंबाळ जखमींचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. लिबियन नॅशनल आर्मीने हा हवाई हल्ला केल्याचा आरोप सरकारने केला आहे. मात्र त्यावर या आर्मीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.