भोपाळ (मध्यप्रदेश) : सोशल मीडियावरून सध्या अनेक प्रकरणे घडताना आपण दररोज पाहतो आहोत. त्यात मग फेसबुक असो वा अन्य कुठला सोशल मीडिया. यावरून अनेक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातून समोर आला आहे. आपल्या फेसबुकवरील मैत्रिणीचे लग्न मोडावे यासाठी एका तरुणाने एक विचित्र गोष्ट केल्याचे समोर आले आहे.
सायबर क्राइमच्या या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, एक तरुण आपल्या फेसबुकवरील मैत्रिणीचं लग्न ठरल्याने खूपच नाराज झाला. त्याने आपल्या या मैत्रिणीचं लग्न मोडावं यासाठी या तरुणाने फेसबुक मैत्रिणीचे एडिटेड केलेले अश्लील फोटो हे तिच्या सासरकडील मंडळींना पाठवणं सुरु केलं. याबाबत मध्य प्रदेशातील सायबर पोलिसांचं असं म्हणणं आहे की, आरोपीने यासाठी फेक फेसबुक आयडी तयार केलं होतं. याच अकाउंटवरुन तो तरुणीचे फोटो हे एडिट करायचा. त्यानंतर हे अश्लील फोटो तो तरुणीच्या ठरलेल्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना पाठवायचा.
याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मध्यप्रदेशमधील जबलपूरमधील आहे. इथे एका तरुणीने साबयर क्राईममध्ये तक्रार नोंदवली होती की, कोणीतरी फेक आयडी तयार करुन तिचे अश्लील एडिटेड फोटो फेसबुकवर शेअर करत आहे. तसचं यावर अनेक अश्लील कमेंटही लिहित आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास देखील सुरु केला. यावेळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, आरोपीचं नाव प्रशांत रजक असं आहे. जो तक्रारदार तरुणीचा फेसबुकवरील मित्र आहे.
पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आणि जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा असं समोर आलं की, तो फेसबुकवरील त्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा आरोपी प्रशांतला समजलं की, तिचं लग्न ठरलं आहे तेव्हा त्याने सुरुवातीला या मैत्रिणीला लग्नासाठी मागणी घातली. पण जेव्हा तरुणीने त्याला नकार दिला त्यावेळी त्याने एक फेक आयडी तयार करुन तिच्या होणाऱ्या पतीला तिचे एडिटेड अश्लील फोटो पाठवले. त्यावेळी त्याचा असा अंदाज होता की, हे फोटो पाहून तिचं लग्न मोडेल आणि नंतर ती त्याच्याशी लग्न करेल.
खरं तर तरुणीचं लग्न इतर ठिकाणी ठरल्याने आरोपी प्रशांत रजक हा खूपच अस्वस्थ झाला होता. कारण त्याला स्वत:ला आपल्या या फेसबुक मैत्रिणीसोबत लग्न करायचं होतं. पण तसं होत नसल्याचं लक्षात येताच तरुणाने अतिशय विकृत पाऊल उचललं. पण अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये पाठवलंच.
त्यामुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत थेट मैत्री केल्यामुळे तरुणीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री न केलेली बरी असे या प्रकरणावरून दिसून आले आहे.