मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘निरमा’ पावडरच्या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा पोशाख केल्याने शिवप्रेमींनी अक्षयच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. यावरून शिवप्रेमी चांगलेच भडकले आहेत.
याबाबत एक वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. अधिक माहिती अशी की, ‘निरमा पावडर’च्या जाहिरातीमध्ये अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे या जाहिरातीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची संतप्त भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
अक्षयकुमारने माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. सोशल मीडियावर #ApologizeAkshay #ApologizeNirama अशा हॅशटॅगसह ‘निरमा’ आणि अक्षयकडून माफीनाम्याची मागणी केली जात आहे.
‘निरमा अॅडव्हान्स’ पावडरच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि मावळे लढाई करुन दरबारात परतल्याचं दाखवलं आहे. त्यावेळी एक महिला युद्धात खराब झालेल्या मावळ्यांच्या कपड्यांवर नाराजी व्यक्त करते. हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील, असं ती म्हणते.
अक्षय कुमार यावर म्हणतो ‘महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!’. त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह मावळे नाचत-गात कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं सांगत अक्षयकुमारकडे माफीची मागणी होत आहे. त्यामुळे सध्या अक्षय या जाहिरातीमुळे ट्रोल होताना दिसत आहे.