जामखेड : पंचायत समितीच्या सभापती पदाच्या उमेदवार राजश्री सूर्यकांत मोरे यांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतल्याने सभापतीपद रिक्त राहिले. तर उपसभापतीपदी भाजपच्या मनीषा रवींद्र सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी ७ जानेवारीला अर्ज घेण्यात आले होते. परंतु वेळेत अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक रद्द झाली होती. त्यानुसार ८ जानेवारीला पुन्हा निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
त्यानुसार सभापती पदासाठी राजश्री मोरे यांनी अर्ज भरला. त्यांना माजी सभापती सुभाष आव्हाड हे सूचक झाले. उपसभापती पदासाठी मनीषा सुरवसे यांनी अर्ज भरला होता. त्यांना डॉ. भगवान मुरूमकर सूचक होते.
यावेळेस सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला होता. परंतु छाननी करण्याच्या अगोदरच राजश्री मोरे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. सभापती पदासाठी एकच अर्ज आला. तोही काढून घेतल्याने जामखेडचे सभापती पद रिक्त राहिले. तर उपसभापतीपदाचा अर्ज वैध राहिल्याने मनीषा सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली.