मुंबई : भारतात एचआयव्ही विषाणूचा नवा धोका निर्माण झाला असून एचआयव्हीचा नवा विषाणू वेगाने पसरत आहे. अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे एड्सचा मोठा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा नवा विषाणू “घाना” या आफ्रिकी देशात प्रथम आढळला असून त्यानंतर तो भारतात आढळला आहे. हा नवा विषाणू एडस संक्रमण करणाऱ्या एचआयव्ही वन आणि एचआयव्ही टू या दोन विषाणूंच्यापासून तयार झाला आहे.
फतेहाबाद येथे सुरु असलेल्या असोसिएशन ऑफ फिजीशीयन ऑफ इंडियाच्या ७५ व्या वार्षिक संमेलनात एड्स विशेषज्ञ पद्मश्री डॉ. अलका देशपांडे यांनी ही माहिती दिली. त्या मुंबईच्या जे जे रुग्णालयात एड्स विभागाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी यावेळी बोलताना एड्सची तपासणी, उपचार आणि नियंत्रण याविषयी रिपोर्ट सादर केला.
त्यानुसार भारतात लागण झाल्यानंतरही एड्स रोगी ३० वर्षापर्यंत चांगले आयुष्य जगत आहेत. परंतु आता नवीन विषाणूची लागण वेगाने होऊ लागल्याचे दिसून येत आहे. घानामध्ये एड्सच्या ६६ टक्के रुग्णात नवीन विषाणू आढळला आहे आणि भारतात सुद्धा ही संख्या वाढती आहे.
या नव्या विषाणूच्या नियंत्रणासाठी अजून संशोधन होण्याची गरज आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक घातक असल्याने रुग्णाचे जीव वाचविणे हे सध्या तरी मोठे आव्हान आहे.