बारामती, प्रतिनिधी : येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्रावर १६ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित कृषिक प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत ही माहिती दिली.
बारामती कृषि विज्ञान केंद्रावर देशातील सर्वात मोठे असे प्रात्यक्षिकयुक्त कृषिक २०२० या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासह अन्य मंत्रीगण या उदघाटन समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान कृषिक प्रदर्शनाच्या यानिमित्ताने सत्तेत असताना उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच बारामतीला येत आहेत. यापूर्वी एकदा ते जाहीर सभेच्या निमित्ताने बारामतीला आले होते. मुख्यमंत्री बारामतीत काय बोलतात, याकडे आता लक्ष लागले आहे.