बारामती : कुणी विटी दांडू खेळतोय तर कोणी दोरीवरच्या उड्या मारतोय. कोणी रस्सीखेच मध्ये रस्सी ओढतोय तर कोणाच्या सूरपाट्यांचा खेळ रंगलाय, कोणी टायर पळवतोय तर कोणी पोत्यातल्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतोय, काही मुली महिला गजगे खेळताहेत तर काही तळ्यात मळ्यातल्या खेळाचा आनंद लुटत आहेत.
बारामतीच्या शारदा प्रांगणावर रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच विस्मृतीत चाललेल्या मातीतल्या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. हे पारंपरिक खेळ खेळल्यानंतर झुंबा नृत्यात अबालवृध्द सहभागी झाले होते. रविवारची सकाळ अनेकांना अनेक दिवसानंतर खऱ्या अर्थाने प्रफुल्लित करुन गेली. पारंपरिक खेळांची माहिती व्हावी व मोकळ्या हवेत मुलांनी मैदानावर येत खेळ खेळावे ही संकल्पना फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मातीतल्या खेळांच्या जत्रेच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली आहे.
या जत्रेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. शारदा प्रांगणात सकाळपासूनच बाळगोपाळांनी येत मातीतील खेळ खेळण्यास प्रारंभ केला होता. मुलांसोबत पालकच नाही तर आजी आजोबांनीही या खेळांचा आनंद घेतला. भोवरा, गोट्या, सुरपाट्या, तळ्यात मळयात, रस्सीखेच, विटी दांडू, दोरीवरच्या उड्या, पोत्यातील उड्या, टायर पळविणे या सारख्या खेळात सर्वच बारामतीकर उत्साहाने सहभागी झाले. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी याप्रसंगी जत्रेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विषद केली. सर्वांचा उत्साह विचारात घेता वर्षातून एकदा ही जत्रा भरवून चालणार नाही, लोकांची मागणी विचारात घेता त्यात वाढ करावी लागेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे, निर्मात्या अश्विनी दरेकर, महेश भागवत, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, संभाजी होळकर, तत्ताड चित्रपटाचे निर्माते प्रीतम म्हेत्रे, दिग्दर्शक संदीप इनामके, कलाकार, प्रफुल्लकुमार कांबळे, डी,के. चेतन, किरण राजगुरु आदी या प्रसंगी उपस्थित होते.काश्मिर ते कन्याकुमारी चार हजार कि.मी. सायकल प्रवास केलेल्या बारामती सायकल क्लबच्या आठ सदस्यांचा या वेळी सुनेत्रा पवार यांनी सत्कार केला.
झुंबाच्या तालावर बारामतीकरांचा ठेका…
मातीतल्या खेळांच्या जत्रेनंतर बारामतीकरांनी झुंबाच्या तालावर ठेका धरला. अनेक जण वय विसरुन आज या नृत्यात सहभागी झाले. या चार तासांच्याउपक्रमामुळे मनावरचा ताण ख-या अर्थाने हलका झाल्याची प्रतिक्रीया लोकांनी व्यक्त केली.