लहान मुलांच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस, रेल्वेतून तस्करी होत असलेल्या ५९ बालकांची पोलिसांनी केली सुटका

नाशिक, ३१ मे २०२३ : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांचे संशयीत तस्करीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या ३० अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर २९ लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आले. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याची योजना होती, असा संशय रेल्वे पोलिसांना आहे. पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने उधळून लावला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या ५९ मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मुलांच्या तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यातील काही मुलांना जळगाव आणि नाशिक येथील उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

दानापूर-पुणे एक्सप्रेस यागाडीमध्ये बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस यांना मिळाली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी रेल्वे गाडीत आणखी ३० मुले आणि चार संशयित तस्कर मिळाले. या सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आले. भुसावळ येथे मिळून आलेल्या मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा