गोल पोस्ट इतर गौतमी पाटीलचा जबरा फॅन, एसटी चालकाने रजेच्या अर्जात टाकलं गौतमीच्या शो ला...

गौतमी पाटीलचा जबरा फॅन, एसटी चालकाने रजेच्या अर्जात टाकलं गौतमीच्या शो ला जायचं कारण

सांगली १२ मे २०२३: संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी, ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ हिचे जिथे जिथे कार्यक्रम असतात, त्या त्या ठिकाणी गर्दीचा पूर वाहत असतो. गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम ठेवण्यासाठी, बघण्यासाठी आणि तिच्या सोबत तिच्या तालावर नाचण्यासाठी सगळ्यांची चढाओढ लागलेली असते. अशा चढाओढीत तासगाव एस टी आगारातील गौतमीचा जबरा फॅन असलेल्या एका चालकाने, चक्क आपल्या रजेच्या अर्जात, रजेच कारण गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला जायचं आहे असं टाकलं आणि सोशल मीडियावर या फॅन च्या अर्जानं गौतमीच्या कार्यक्रमा इतकीच रंगत आणली.

एसटी महामंडळाच्या तासगाव आगारात काम करणाऱ्या एका चालकानं, गौतमीच्या डान्स कार्यक्रमासाठी दोन दिवसांची सुटी हवी म्हणून आगार प्रमुखांकडे रजेचा अर्ज केला आहे. हा रजेचा अर्ज आता सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल अर्जानुसार अर्ज करणाऱ्या चालकाचे नाव प्रकाश रामचंद्र यमगर असे आहे.

गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमाइतकीच सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या अनेक गावांत उत्सव चालू आहेत त्या निमित्ताने कींवा वाढदिवस,लग्न अशा अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. थोडा विरंगुळा म्हणून तसेच हा सगळा माहोल अनुभवण्यासाठी, बरेच लोक आपलं हातातलं काम सोडून गौतमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.

गौतमीच्या या दर्दी चाहत्याने, म्हणजेच एसटी चालक प्रकाश यमगर ने २२ मे आणि २३ मे अशा दोन दिवसांच्या रजेसाठी अर्ज केलाय. यात रजेचे कारण म्हणून त्याने गौतमी पाटील कार्यक्रमासाठी त्याच्या गावात येणार आहे, म्हणून दोन दिवस रजा मिळावी अशी विनंती केली आहे. हा सगळा गमतीशीर प्रकार सोशल मीडियावर लोकप्रिय होतोय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version