कुंदुझ, 9 ऑक्टोंबर 2021: अफगाणिस्तानच्या कुंदुझमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान मोठा स्फोट झाला. यामध्ये 100 लोक मरण पावले आणि अनेक जखमी झाले. या स्फोट च्या माध्यमातून हजारा शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आलं. कुंदुज सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की आतापर्यंत आम्हाला हॉस्पिटलमध्ये 35 मृतदेह सापडले आहेत आणि 50 हून अधिक जखमींना दाखल करण्यात आलं आहे. त्याच वेळी, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर (एमएसएफ) द्वारे चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या रुग्णालयात 15 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यावर हा देशातील सर्वात मोठा हल्ला आहे. कुंदुजमधील संस्कृती आणि माहिती संचालक मतिउल्लाह रौहानी म्हणाले की, हा आत्मघातकी हल्ला होता, तर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, कुंदुजमधील मशिदीतील स्फोटात अनेक लोक मारले गेले आहेत. मात्र, मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.
आयएसने जबाबदारी घेतली, म्हणाले- शिया मुस्लिम आमच्या निशाण्यावर
इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने फिदायिन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने म्हटले की, आमचे लक्ष्य शिया मुस्लिम आणि त्यांच्या धार्मिक संस्था आहेत. आयएसशी संबंधित आमक वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं साइट इंटेलिजन्स ग्रुपने याची पुष्टी केली आहे.
हल्ल्याच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी मशिदीत सुमारे 300 लोक उपस्थित होते. हे लोक शुक्रवारच्या प्रार्थनेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. साक्षीदारांनी सांगितलं की त्यांनी प्रार्थना करत असताना स्फोटाचा आवाज ऐकला. घटनास्थळी आरडाओरडा झाला आणि लोक इकडे तिकडे पळू लागले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे