सातारा, ३१ डिसेंबर २०२२ : येथील ‘श्री साई स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवारी (ता. २८) उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, कोळीगीत, बालगीते आदी विविध प्रकारचे कलाविष्कार, नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यादरम्यान आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मा. रवी साळुंखे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), मा. सतीश माने (लोकनियुक्त सरपंच संभाजीनगर), मा. रामदास साळुंखे (माजी पंचायत समिती सदस्य), मा. डॉक्टर प्रवीण जाधव (अध्यक्ष, नंदा स्मृती प्रतिष्ठान), मा. राजू निंबाळकर (चीफ सेक्रेटरी, दैनिक सकाळ), मा. संपत जाधव (अध्यक्ष, श्री साई स्कूल) आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
‘श्री साई स्कूल’चे प्रिन्सिपल महेश जाधव यांनी ‘श्री साई स्कूल’ला नुकतेच ‘आयएसओ : २१००१’ मानांकन मिळाले असल्याचे सांगून, शाळेच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले, की श्री साई स्कूल ही साताऱ्यातील नामांकित प्री-प्रायमरी स्कूल असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरण सर्वांगीण विकासावर वैयक्तिक लक्ष केंद्रित केले जाते; यावर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेने अतिशय माफक शुल्कात सिनीअर केजी, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी अबॅकस क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अमृता जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर ‘श्री साई स्कूल’चे प्रिन्सिपल महेश जाधव यांनी आभार मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील