डोंबिवली, १५ ऑगस्ट २०२३ : ज्यादा व्याजाचे आमिष दाखवत एका वृद्धाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील सेवानिवृत्ताची ७७ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम गणपत निलख असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पूजा भोईर आणि विशाल भोईर अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. या दाम्पत्यावर याआधीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते. ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून या दाम्पत्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळते.
शांताराम गणपत निलख हे ६० वर्षीय व्यक्ती डोंबिवली शिवमंदिर परिसरात राहतात. निलख यांची कल्याणमधील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या पूजा भोईर आणि विशाल भोईर यांच्याशी ओळख होती. याचाच फायदा घेत भोईर दाम्पत्याने निलख यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दर महिन्याला मोठी रक्कम परतावा म्हणून मिळणार असल्याचे आमिष दाखवले. निलख यांनी भोईर दाम्पत्यावर विश्वास ठेवत तब्बल ७७ लाख रुपये गुंतवले.
पैसे घेतल्यानंतर निलख यांना दर महिन्याला जी ठराविक रक्कम मिळणे आवश्यक होती ती रक्कम देण्यास भोईर दाम्पत्य टाळाटाळ करु लागले. सतत तगादा लावूनही भोईर दाम्पत्य व्याजाचे पैसेही परत देत नव्हते आणि मूळ रक्कमही परत केली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निलख यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत दामपत्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर