बारामती, २३ जानेवारी २०२१: अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगर परिषदेने फौजदारी कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे.या प्रकरणी पालिकेने नोटीस दिल्यानंतरही अनधिकृत बांधकाम न काढल्याने या प्रकरणात सम्राट रमेश शहा (रा. महावीर पथ, बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार रोहित राजेंद्र पाटील यांनी याबाबत शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे शहा यांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ ते कलम ५२ व ५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सम्राट शहा यांना बारामती पालिकेने सुधारित बांधकाम परवान्याच्या अन्वये ८ नोव्हेंबर २०११ रोजी परवानगी दिली होती. परंतु बांधकामधारक शहा हे मंजूरी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम करत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने त्यांना २८ आॅगस्ट २०२० रोजी नोटीस बजावली.
या नोटीसीमध्ये मंजूर बांधकामाव्यतिरिक्त केलेले वाढीव बांधकाम काढून टाकावे, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु निर्धारित मुदतीत शहा यांनी कोणताही सुधारित प्रस्ताव नगरपालिकेकडे दाखल केला नाही. तसेच केलेले अनधिकृत बांधकाम काढून घेतले नाही.
दि.९ आॅक्टोबर २०२० रोजी पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी देवीदास साळुंखे व रचना सहाय्यक अक्षय तोरस्कर यांनी बांधकामाच्या ठिकाणी जावून पाहणी केली. त्यावेळी मंजूरीपेक्षा वाढीव बांधकाम केल्याचे निदर्सनास आले. त्यानंतर पुन्हा १६ आॅक्टोबर २०२० रोजी वाढीव बांधकाम काढावे, अशी नोटीस पालिकेकडून देण्यात आली. त्यानंतरही बांधकाम न काढल्याने शहा यांच्याविरोधात बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव