ठाणे, १२ ऑक्टोबर २०२२:ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभग भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा आणि जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली.
मात्र, या भाषणादरम्यान नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाचे नौपाडा उप विभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांनी केला आहे. गवस यांनी तक्रारीमध्ये नेमकी कोणी काय वादग्रस्त वक्तव्य केली, हे देखील नमुद केले आहे. गवस यांच्या तक्रारीनंतर मंगळवारी कलम १५३, ५००, ५०४ प्रमाणे एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
देशात सत्य मांडणे गुन्हा असेल तर तो आम्ही करणार…
याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत. पुढे त्या म्हणाल्या, मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.