उदगीर, लातूर ८ मार्च २०२४ : देवणी तालुक्यातील कमालवाडी येथे मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कमालवाडी येथे ६ मार्च रोजी अल्पवयीन मुलगी देवणी येथे क्लासेसला जाण्यासाठी आपल्या मैत्रीणी सोबत बसची वाट पाहत पाण्याच्या टाकीजवळ थांबली असता, गावातीलच एका मुलाने मुलीजवळ येऊन मोबाईल नंबर मागितला. तीने देण्यास नकार दिला असता त्या मुलाने वाईट हेतूने, तू मला आवडतेस असे म्हणत मुलीची ओढणी व हात धरून विनयभंग केला, अशी फिर्याद मुलीने देवणी पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीनुसार आरोपीवर देवणी पोलीस ठाण्यात कलम ३५४ भादवी व लैंगिक अत्याचार अधिनियम ८, १२,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौंड हे करीत आहेत. देवणी तालुक्यातील विनयभंगाची ही चौथी घटना असून सतत घडणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक