मुंबई, २१ ऑक्टोबर २०२०: मुंबई आणि एमएमआर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिला. ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्याच्या घटनेवर सखोल चर्चा केली. या बैठकीला महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक उपस्थित होते.
मंत्री डॉ राऊत यांनी प्रकाशगड या ऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुंबईतील वीज ठप्प होण्यावर सखोल चर्चा केली. मुंबईत भविष्यात असा वीज ठप्प होण्याचा प्रकार होऊ नये यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आयलँडिंग यंत्रणेची नवी डिझाइन तयार करा अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी केली. महापारेषण विभागातर्फे या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून शनिवारपर्यंत आम्ही आपला अहवाल सादर करू असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर बोलताना मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
राज्यात वीज पारेषण क्षेत्रात ‘एसएलडीसी’ची भूमिका महत्त्वाची आहे. या केंद्राने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली का? याबाबत अन्य संबंधित यंत्रणांना पूर्वसूचना देण्यात आली होती का? यासारख्या बाबीही तपासाव्या लागतील, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.
“१९८१ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आयलँडिंग यंत्रणा ही मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सोयीसाठी उभारण्यात आली का? १९८१ च्या तुलनेत आज लोकसंख्या वाढली, तंत्रज्ञान बदलले आणि वीज निर्मितीही वाढली. मग या यंत्रणेत गेल्या ४० वर्षात काय बदल केले गेले? जगातील प्रमुख महानगरामध्ये आयलँडिंग यंत्रणा कशी काम करते? त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो? याचा आजवर तुम्ही काही अभ्यास केला का? हा प्रश्न लगेच उद्भवू नये म्हणून आणि भविष्यात ३० वर्षात उद्भवू नये म्हणून कोणत्या योजना तुम्ही आखल्या?,” असे प्रश्नच त्यांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे