पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांची व्यापक बैठक

पुणे, २९ ऑगस्ट २०२४ : देशभरात घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण बैठक आज (गुरुवार, दि. २९ ऑगस्ट) स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये पार पडली. त्यामध्ये ३२ संस्थांचे एकूण ८१ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सोहनलाल जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ गजानन एकबोटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष आनंदी पाटील, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव रेखा पळशीकर, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पैलू अधोरेखित केले.

तसेच बैठकीत सहभागी झालेल्या पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांचे चालक, विश्वस्त, नियामक मंडळ सदस्य इ. पदाधिकाऱ्यांनी देखील विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्यासंदर्भातील उपाययोजनांबद्दल आपले विचार मांडले.

पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. शाळा, महाविद्यालयातील ब्लॅकस्पॉट शोधून तेथे उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत अशी सूचना त्यांनी केली.

डॉ.गजानन एकबोटे यांनी शिक्षण संस्थांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे तसेच आपल्या संस्थांच्या दैनंदिन कार्याक्रमांवर वचक ठेवायला हवा असे आग्रहाने सांगितले. आनंदी पाटील यांनी लैंगिक शिक्षणासोबतच लैंगिकता शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. विशाखा समितीमधली नावे जाहीर करणे, दत्तक मैत्रीण योजना यांसारखे प्रयोग महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या रेखा पळशीकर यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर सांगितले. प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनीदेखील संस्थाचालकांनी आत्मपरीक्षण करावे अशी सूचना केली. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरातदेखील अनेक चांगल्या सूचना आल्या. या बैठकीचा समारोप करताना एस.के. जैन यांनी सर्व समाजात विश्वासाचे वातावरण तयार होण्यावर भर दिला. शिक्षकाने नुसते शिक्षक न होता नेता होऊन समाजाचे दिग्दर्शन करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. त्याकरिता अनेक नवनवीन प्रयोग करून पाहिले पाहिजेत आणि सकारात्मक उद्देश्याने आपण एकत्र येत राहायला हवे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक अशा शिक्षणाशी संबंधित विविध घटकांना सहभाग करून घेताना प्रत्येकाने आपली जबाबदारी सजगतेने पार पाडण्याची आवश्यकता असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी विविध सुरक्षा उपाययोजना, आरोग्यविषयक खबरदारी, डिजिटल सुरक्षा, आपत्कालीन संपर्काबाबत सजगता, विद्यार्थ्यांच्या हितासाठी जाणीव-जागृती व प्रशिक्षण, विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील परस्पर सुसंवादासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, शाळेतील सुविधांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विद्यार्थ्याबरोबरच पालकांचे समुपदेशन, विद्यार्थ्यांच्या संदर्भात असलेली शिक्षकांची जबाबदारी, शाळेच्या आवारातील प्रवेशाबाबत नियमन, विद्यार्थ्यांना सृजनात्मक अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देणे, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ यांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समाजाचे सहकार्य अशा विविध दृष्टिकोनातून या बैठकीत विचारविनिमय झाला.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा