संचारबंदी वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार, राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, २९ एप्रिल २०२१: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे. राज्यात कोरोनाला थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेले ब्रेक द चेन अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी वाढवण्यात येणार आहेत. हे नियम आणखी १५ दिवसांकरीता वाढवले जाऊ शकतात. कोरोनाला थोपवण्यासाठीच्या उपायोजना, तसेच लसीकरणावर चर्चा करण्यासाठी काल (२८ एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली.

राज्यातल्या १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीत हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळला कोविड लस प्रकल्प सुरू करायलाही मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या उभारणीसाठी ९४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून देण्यात येईल. तर केंद्र शासनानं ६५ कोटी रूपये अर्थसहाय्य मंजूर केलं आहे.

राजेश टोपे काय म्हणाले ?

कोरोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत कोरोना संसर्ग, लसीकरण आणि ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक नियम यावर चर्चा करण्यात आली. याविषयी माहिती देताना, “ब्रेक द चेनच्या अनुषंगाने आपण लॉकाडाऊन लागू केलेला आहे. आज त्यावरही चर्चा झाली. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या नियमांना लांबवणीवर टाकावंच लागेल. त्यावर सध्या चर्चा झाली. निर्बंधाच्या शेवटच्या दिवशी सध्याचे नियम १५ दिवस वाढवायचे की काय करायचं याबाबत चर्चा होईल. ब्रेक द चेनचे नियम आणखी किमान १५ दिवस वाढवले जाऊ शकतात, असा माझा अंदाज आहे,” असे राजेश टोपे म्हणाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा