गोल पोस्ट गुन्हा खराडीत कौटुंबिक वादातून जावयाला पेटविले; पत्नीसह सासू-सासरे, नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल

खराडीत कौटुंबिक वादातून जावयाला पेटविले; पत्नीसह सासू-सासरे, नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल

पुणे, २ जानेवारी २०२३ : कौटुंबिक वादातून पत्नी, सासू- सासरे, तसेच नातेवाइकांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता ३० डिसेंबर २०२२) खराडी भागात घडली. या घटनेत जावई भाजला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लखन बाजीराव काळे ( वय ३२, रा. शिरूर) असे गंभीर भाजलेल्या जावयाचे नाव आहे. लखन काळे याने याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासरे रणजित ऊर्फ गेंड्या भोसले, सासू बासुंदी रणजित भोसले, साडू अल्ताफ विजय काळे, लखनची पत्नी पेडम लखन काळे यांच्यासह नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन काळे आणि त्याची पत्नी पेडम यांच्यात वाद झाला होता. दोघे विभक्त झाले आहेत. काळे सायंकाळी खराडी परिसरात एका झाडखाली बसला होता. त्यावेळी त्याचे सासू, सासरे आणि नातेवाईक तेथे आले. पत्नीला का नांदवत नाही, अशी विचारणा करून आरोपींनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. लखनला मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version