सोलापूर, २५ फेब्रुवारी २०२३ : कांद्याचे पीक विकण्यासाठी ७० किलोमीटरचा प्रवास करून मंडईत आलेल्या शेतकऱ्याचे डोळे भरून आले. प्रत्यक्षात ५१२ किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपयेच मिळत होते. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राहणारे शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विकून केवळ २ रुपये कमविले. कांदा विकल्यानंतर त्यांना पोस्ट- डेटेड चेक देण्यात आला जो पंधरा दिवसांनी क्लिअर झाला. प्राप्त रकमेतून वाहतूक खर्च कमी केला असता नफा फक्त दोन रुपये होता. यानंतर शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. राज्यकर्ते आणि धोरणकर्ते लाख दावे करतात; पण यावरून देशातील अन्नदाता शेतकऱ्याची काय अवस्था आहे, याचा अंदाज येतो.
शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण म्हणाले की, गेल्या काही वर्षांत कांद्याची लागवड खूप महाग झाली आहे. खते, कीटकनाशके, बियाणांच्या किमतीही वाढल्या आहेत. यावेळी ५०० किलो कांदा पिकविण्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च झाल्याचे चव्हाण सांगतात. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रासह इतर कांदा उत्पादक राज्यात चांगले पीक आल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. नाशिकच्या लासलगाव कांदा मार्केटमध्येही त्याचा परिणाम जाणवला आहे.
सोलापूर ‘एपीएमसी’चे संचालक केदार उंब्रजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी शेतकरी राजेंद्र चव्हाण कांदा घेऊन मंडईत आले त्या दिवशी बाजारात १२ हजार पोती कांद्याची आवक झाली होती. दुसरीकडे चव्हाण यांचे कांदे खरेदी करणारे नसीर खलिफा यांचे म्हणणे आहे की, कांद्याचा दर्जा चांगला नव्हता. कमी दर्जाच्या कांद्याला मागणी नाही. दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कांदा उत्पादकांना सामान्यत: केवळ २५ टक्के चांगल्या प्रतीचा कांदा आणि ३० टक्के कमी दर्जाचा कांदा मिळतो; मात्र ते विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे फारसा पर्याय नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे खरिपाचे पीक विकण्यासाठी केवळ एक महिन्याचा अवधी आहे. त्यानंतर भाज्या सडू लागतात. हे देखील नुकसानीचे एक प्रमुख कारण आहे.
सोलापूर ‘एपीएमसी’चे संचालक केदार उंब्राजे, जे कांद्याचे व्यापारी देखील आहेत. ते म्हणाले की, लासलगाव बाजारात डिसेंबरमध्ये दररोज १५,००० क्विंटल कांद्याची आवक होत होती, ती आता दुप्पट होऊन ३०,००० क्विंटल झाली आहे. लासलगावमधील सरासरी घाऊक कांद्याचा भाव २६ डिसेंबर २०२२ रोजी प्रति क्विंटल १८५० रुपये होता तो २३ फेब्रुवारी २०२३ रोजी ५५० रुपये प्रतिक्विंटल झाला. राज्यभराची ही कहाणी आहे. ज्या दिवशी बार्शीच्या शेतकऱ्याने कांदा आणला, त्या दिवशी ‘एपीएमसी’मध्ये कांद्याच्या १२,००० गोण्या भरल्या होत्या.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड