माढा, दि. २२ जुलै २०२०: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यातून सुमारे ७७ लाख ७ हजार ४८० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त १० लाख ५२ हजार ५८० रूपये हे मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत, यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. ६ ते २० जुलै २०२० दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी ३५,६५० प्रकरणात ५८ लाख २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने ९७२३ प्रकरणात १४ लाख ३८ हजार ४०० रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून ३२७२ प्रकरणात ४ लाख ४२ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला.
मास्क न वापरणाऱ्या १० हजार २२६ जणांकडून १० लाख ५२ हजार ५८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल दुचाकीवर दोघांनी प्रवास केलेल्या ७८७ जणांकडून ३ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल झाला आहे. दुचाकीवर तिघांनी प्रवास- वसूल केलेली रक्कम १० हजार ५०० रूपये, तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती- सात हजार रूपये, चार चाकी वाहनात चारपेक्षा अधिक व्यक्ती-४० हजार ९०० रूपये, निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवलेले- ७६ हजार ५०० रूपये, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती-६५ हजार ५०० रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- ५९ हजार ९०० रूपये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केलेले- ६६ हजार १०० रूपये, मास्क न लावणारे विक्रेते- ३६ हजार ७०० रूपये आणि सार्वजनिक ठिकाणी दारू-पान-तंबाखू सेवन- एक लाख पाच हजार ६०० रूपये असा दंड वसूल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील