पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली

पुणे, १३ जानेवारी २०२३ : पुण्यातील सिंहगड रोड येथील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे दूरपर्यंत आगीचे लोळ पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, MNGL पाईपलाईनचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि या स्फोटातून आगीचे मोठे लोळ बाहेर आले. या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे इथून वाहतूक वळवण्यात आली होती. अखेर पहाटे चार वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

दरम्यान, या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पाईपलाईनचे खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाईन लीक झाली आणि हा स्फोट झाला. त्यामुळे पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे.

  • नऱ्हे परिसरात गोडाऊनला आग

एकीकडे गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच
पुण्यातील नऱ्हे परिसरात भंगार सामानाच्या एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. याठिकाणी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पुणे शहर एकाचवेळी दोन आगीच्या घटनांनी होरपळून निघाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा