पंढरपूर नगरपालिकेवर धडकला मनसेचा भव्य मोर्चा, करवाढ रद्द करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन

पंढरपूर ११ डिसेंबर २०२३ : पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर भरमसाठ वाढ केल्याने, सोमवारी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि विठ्ठल परिवार यांच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला. पुढे चौफाळा येथून मार्गक्रमण करत हा मोर्चा थेट नगरपालिकेवर धडकला. मोर्चामध्ये पंढरपूर शहरातील मनसे पदाधिकारी, पंढरपूरकर नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जात नाही, प्रधान आवास योजनेतील हक्काची घरे मिळत नाहीत, झोपडपट्टीत गेले अनेक वर्ष राहणाऱ्या नागरिकांना सातबारा उतारा दिला गेला नाही, बंद अवस्थेतील बोरवेल, शहरातील बंद अवस्थेतील उद्याने, पालिकेचे बंद अवस्थेतील दवाखाने, शहरातील रस्त्याची दुरावस्था, स्मशानभूमीची दुरावस्था, नगरपालिका शाळांचे इमारती मोडकळीस आले आहेत तरी सुद्धा नगरपालिकेकडून नागरिकांवर जुलमी करवाढ केली आहे. नगरपालिकेने चुकीच्या खाजगी एजन्सीला सर्वेक्षणाचे टेंडर देऊन खोटे सर्वेक्षण करून घेतले आहे. यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित एजन्सीवर कारवाई करून नगरपालिकेचे दीड कोटी रुपये वसूल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.

नागरिकांनी प्रलंबित कामे होई पर्यंत कोणताही कर भरू नये, कर वसुलीसाठी कोण कर्मचारी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या नेतेमंडळींचा चांगला समाचार घेतला.

न्युज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा