गोल पोस्ट सामाजिक उपक्रम शिवजयंतीनिमित्त दुबईत साकारली भव्य शिवसृष्टी २०२६

शिवजयंतीनिमित्त दुबईत साकारली भव्य शिवसृष्टी २०२६

१४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवसृष्टी २०२६ उत्साहात पार पडली. रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या कल्पनेतून साकारलेली ही भव्य-दिव्य शिवसृष्टी दुबईतील शिवप्रेमींच्या पसंतीस उतरली. २००० हून अधिक नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग घेत महाराजांचा इतिहास नव्याने जाणून घेतला.या कार्यक्रमात भारताबाहेर सर्वाधिक मर्दानी खेळ सहभागींचे थेट सादरीकरण करून एक अनोखा विक्रम नोंदविण्यात आला. इतिहास अभ्यासक शैलेश वरखडे यांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संदर्भांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रमुख पाहुण्या जया उदय सामंत यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रथा व रक्षक प्रतिष्ठान यांच्या अभिनव संकल्पनांचे विशेष कौतुक केले.त्रिविक्रम लोककला पथक यांनी खास लोककलेचे सादरीकरण करून शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना साकारणारे दिग्दर्शक सागर पाटील यांनी सांगितले की, “शिवसृष्टी हा केवळ शिवजयंती उत्सव नसून एक अभ्यासपूर्ण कार्यशाळा आहे. आम्ही संशोधन करून महाराजांचा इतिहास समजून घेतो आणि तो दुबईतील शिवप्रेमींसमोर रंजक पद्धतीने मांडतो.”गड संवर्धन व किल्ले बांधणीचे प्रात्यक्षिक, मुलांसाठी इतिहास शिकवणारे नाविन्यपूर्ण खेळ, वास्तवदर्शी पावनखिंड अनुभव, तसेच विविध बालउपक्रमांमुळे शिवसृष्टीने इतिहास जिवंत केल्याचा अनुभव उपस्थितांना आला. परदेशात राहूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारा हा उपक्रम ठरला.शिवसृष्टी २०२६ हा केवळ उत्सव नसून इतिहास अनुभवण्याचा आणि पुढील पिढीकडे अभिमानाने पोहोचवण्याचा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा ठरला. ह्या उत्सवात प्रथा व त्रिविक्रम ढोलताशा पथकाचे volunteers ने उत्तम साथ देऊन संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पणे पार पडला.

न्युज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version