जम्मू काश्मीर, दि. १ जुलै २०२०: आपल्याच आजोबांच्या मृतदेहावर बसून आजोबांना उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तीन वर्षाच्या मुलाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य समोर आले आहे. हे दृश्य कश्मीर खोर्यातील आहे. कश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यामध्ये होणाऱ्या चकमकी या काही नवीन नाहीत. आत्तापर्यंत शेकडो जवान दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले आहेत. आज सकाळीच झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर तीन जवान जखमी आहेत व त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु या चकमकीत तेथील एक स्थानिक नागरिक देखील मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
या चकमकीत मृत्युमुखी पडलेला हा नागरिक ६० वर्षाचा वृद्ध होता. घटनास्थळावरुन जो फोटो समोर आला आहे तो दाहकता दाखवून देणारा आहे. जमिनीवर मृतदेह पडला असून, कपडे रक्ताने माखले आहेत. त्या नागरिकाचा ३ वर्षाचा नातू आपल्या आजोबाच्या अंगावर बसला होता. हा नातू त्याच्या आजोबांना उठवण्याचा प्रयत्न करत होता. या दोघांच्याही बाजूलाच भारतीय सैन्याचा एक जवान अतिरेक्यांवर निशाणा धरुन बसलेला होता, त्या चिमुकल्याला आपल्याकडे बोलावून घेत होता. नंतर जवानाने त्या चिमुकल्याला आपल्या कडेवर घेतले.
हे दृश्य काळजाला चटका लावून जाणारा आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे तेथील स्थानिक लोक तर त्रस्त आहेतच पण भारतीय सैन्याला देखील या आतंकवाद बरोबरच अशा हदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे हिंमत दाखवत आतंकवाद्यांचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे भावनांवर संयम ठेवून अशा घटनाना देखील सामोरे जावे लागत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी