पंढरपूर, ८ ऑगस्ट २०२२ : श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली. यामुळे दर्शनासाठी पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे तीन लाख भाविकांनी पंढरीत हजेरी लावली आहे. या गर्दीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. भाविकांना तब्बल आठ तास रांगेत उभे राहून दर्शनासाठी कसरत करावी लागत आहे.
श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला खास महत्त्व असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची संख्या वाढत आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून सातत्याने पंढरपूर मध्ये भाविक दाखल होत आहेत व विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
मोठ्या प्रमाणावर आलेल्या भाविकांना आपल्या राहण्याची व्यवस्था करावी लागत असल्याने पंढरपूर मधील हॉटेल, लॉज आणि मठ तुडुंब भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भाविकांचा ओघ असाच राहिल्यास पंढरपूर मध्ये पुढील दोन ते तीन दिवस गर्दी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले असल्याने दर्शनबारीची रांग लांबून देवदर्शनासाठी कालावधी वाढत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: