मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारा नेता हरपला

पुणे, १४ ऑगस्ट, २०२२ : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते.

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यावेळी त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितलं की, आम्हाला एका मोठ्या ट्रकने कट मारला. ज्यामुळे कार ट्रकच्या बंपरमध्ये अडकून फरफटत गेली. मदत वेळेवर पोहोचली नाही. अपघातानंतर त्यांना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय आहे. त्यांचे पार्थिव जे.जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेलं असून त्यांच्या वडाळ्याच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे.
रसायनी पोलिस याचा तपास करत असून त्यांचा चालक एकनाथ कदम याची वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, विनोद तावडे या सर्वांनी मेटेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

१५ ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. मराठा समाजासाठी झगडणारा, संघर्ष करणारा नेता हरपला, अशा प्रतिक्रीया जनमानसातून येत आहे. अशा या शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांना न्यूज अनकटतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा