शब्दाला जागणारा नेता काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत होते. अल्पकालीन लोकसभेची कारकीर्द वगळता ते सातत्याने बारामती मतदारसंघातून निवडून येत होते. विकासाची दूरदृष्टी असलेला नेता, परखड, स्पष्टवक्ता नेता, प्रशासनावर कमालीची पकड आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीचा विकास पाहिला, तर आमदार कसा असावा, याचे ते ज्वलंत उदाहरण होते.शरद पवार यांचे पुतणे म्हणून राजकारणात प्रवेश केलेले अजित पवार केवळ त्यांच्या वारशावर उभा राहिले नाही, तर स्वतःची वेगळी ओळख, शैली आणि ताकद निर्माण करून गेले. स्पष्टवक्तेपणा, आक्रमक निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभव यामुळे ते समर्थकांसाठी ‘कामाचा नेता’ होते. अजित पवार यांची ओळख प्रामुख्याने एक कडक प्रशासक, वित्तीय शिस्तीचा आग्रह धरणारा आणि निर्णय घेताना फारसा भावनिक न होणारा नेता अशी आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प हाताळला. सिंचन, पाणीवाटप, कृषी अर्थकारण आणि पायाभूत सुविधा हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले. ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव मोठा राहिला. सहकार चळवळ, साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांवर त्यांचे वर्चस्व दीर्घकाळ टिकून राहिले. त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे त्यांनी वेळोवेळी घेतलेले धक्कादायक निर्णय. २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीपासून ते नंतरच्या राजकीय घडामोडींपर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणे आणि नंतर पक्षातच फूट पाडत वेगळ्या गटासह सत्तेत सहभागी होणे, या घटनांनी त्यांच्या राजकारणातील व्यवहार्य आणि सत्ताकेंद्रित दृष्टिकोनाला अधोरेखित केले. समर्थकांच्या मते अजित पवार हे वास्तववादी राजकारणी होते.

बदलत्या परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता, सत्ता आणि प्रशासन यांचा उपयोग करून विकास साधण्याची त्यांची भूमिका समर्थकांना पटते. ‘सत्तेत राहिल्याशिवाय काम करता येत नाही’ हा त्यांचा अप्रत्यक्ष संदेश अनेकांना व्यवहार्य वाटतो. त्यामुळेच अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. अजित पवार यांचे नेतृत्व हे करिष्म्यापेक्षा नियंत्रणावर आधारित होते. ते भावनिक भाषणांपेक्षा आकडेवारी, योजना आणि निधी यांवर अधिक भर देत. अधिकारी वर्गावर पकड ठेवणे, निर्णयांची अंमलबजावणी करून घेणे आणि विरोधाला थेट सामोरे जाणे ही त्यांची शैली होती. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्लक्ष करता न येणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, उचललेली पावले आणि निर्माण केलेले वाद यांमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या समकालीन राजकारणाची चर्चा अपूर्ण आहे. स्पष्टवक्तेपणा, कठोर प्रशासकीय भूमिका आणि आक्रमक राजकारण यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा जबाबदारी सांभाळली आहे. वित्त खाते, नियोजन विभाग यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली. अर्थसंकल्पीय बाबींवरील त्यांचे प्रभुत्व आणि आकडेवारीवरील पकड यामुळे ते एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जात. त्यांची कार्यशैली अत्यंत शिस्तप्रिय आणि कधी कधी कठोर मानली जाते.

कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा त्यांना सहन होत नव्हता. अधिकाऱ्यांना थेट सूचना देणे, वेळेवर निर्णय घेणे आणि कामाचा पाठपुरावा करणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. पहाटे सहा वाजताच फील्डवर उपस्थित राहणारा आणि वेळ पाळणारा नेता अशी त्यांची ओळख होती. हे दोन्ही गुण पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. पाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्र हे अजित पवार यांच्या राजकारणातील महत्त्वाचे विषय राहिले आहेत. दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देणे, कालवे, धरणे आणि सिंचन प्रकल्प राबवणे यावर त्यांनी विशेष भर दिला. काही प्रकल्पांवरून त्यांच्यावर टीकाही झाली, चौकशी झाली; मात्र त्यांनी नेहमीच आपण घेतलेले निर्णय विकासासाठीच होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. राजकारणातील चढउतार अजित पवार यांच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात आले. पक्षांतर्गत मतभेद, सत्तास्थापनेदरम्यान घेतलेले धक्कादायक निर्णय, तसेच राजकीय भूमिका बदल यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेकदा अनपेक्षित वळण मिळाले आहे. अजित पवार यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा थेट संवाद. ते लोकसभा, विधानसभेत किंवा सार्वजनिक सभांमध्ये मुद्देसूद आणि थेट भाषेत बोलत. अलंकारिक भाषेपेक्षा वास्तववादी आणि कधी कधी बोचऱ्या शब्दांचा वापर ही त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील जनतेला ही शैली आपलीशी वाटते.सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत अजित पवार यांचा दृष्टिकोन प्रामुख्याने व्यवहार्य आहे. मोठ्या घोषणा करण्यापेक्षा उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, अर्थसंकल्पीय शिस्त आणि परिणामकारक अंमलबजावणी यावर ते भर देत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर शरद पवार यांच्या राजकीय शिस्तीचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव दिसतो; मात्र अजित पवार यांनी स्वतःची स्वतंत्र, आक्रमक आणि कधी कधी बंडखोर अशी प्रतिमा निर्माण केली आहे.

सत्ता असो वा विरोधात; त्यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली आहे. अजित पवार हे कार्यक्षम, आणि परंपरागत राजकारणापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारे नेते होते. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, कठोर प्रशासकीय भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे अजित पवार यांची ओळख एक कठोर प्रशासक नेता अशी निर्माण झाली होती. ते केवळ राजकारणी नसून एक कार्यक्षम प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वशैलीवर समर्थक आणि टीकाकार अशा दोन्ही बाजूंनी चर्चा होत असते; मात्र त्यांच्या कार्यशैलीत असलेली ठामपणा आणि परिणामकारकता नाकारता येत नाही.अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे होते; मात्र त्यांनी केवळ घराणेशाहीच्या जोरावर राजकारणात स्थान मिळवले, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. बारामती तालुक्यातून राजकारणाची सुरुवात करत त्यांनी हळूहळू राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत मजल मारली. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अनेक वेळा समर्थपणे सांभाळल्या. त्यांची सर्वात ठळक ओळख म्हणजे त्यांची कठोर आणि शिस्तप्रिय प्रशासकीय शैली. कामात दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता त्यांना मान्य नाही. अधिकारी वर्गाला थेट प्रश्न विचारणे, वेळेची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि निकालाभिमुख प्रशासन यावर त्यांचा भर असायचा. अनेक वेळा त्यांच्या भाषेतील रोखठोकपणा चर्चेचा विषय ठरायचा; मात्र त्यामागील उद्देश काम लवकर आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावे, हाच असतो. त्यांचा प्रशासकीय कठोरपणा हा विकासाशी जोडलेला होता. सिंचन, पाणीपुरवठा, शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना गती दिली.

अवघड परिस्थितीतही निर्णय घेण्याची त्यांची तयारी असायची. काही निर्णय वादग्रस्त ठरले असले, तरी ते निर्णय घेण्यापासून मागे हटले नाहीत. राजकीय धाडस, सत्ता संतुलनाचे भान आणि प्रसंगी आक्रमक भूमिका घेण्याची क्षमता यामुळे ते वेगळे ठरले. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मांडताना वास्तववादी आकडे, विकासावर भर आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून आला. खर्चावर नियंत्रण, योजनांची अंमलबजावणी आणि निधीचा योग्य वापर याबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. अजितदादांची कठोर शैली ही त्यांच्यासाठी ताकद असली, तरी तीच बाब अनेकदा टीकेचे कारणही ठरली. त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले. काही वेळा अधिकारी, विरोधक किंवा प्रसारमाध्यमांवर केलेल्या टिप्पणींमुळे त्यांच्यावर टीका झाली; मात्र त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांचे काम अधिक महत्त्वाचे आहे. कठोर प्रशासक असूनही अजित पवार जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. दौरे, आढावा बैठक, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी यामुळे ते जमिनीवरील वास्तव जाणून घेत. बारामती मतदारसंघातील विकासकामे हे त्यांच्या कार्यक्षम प्रशासनाचे उदाहरण मानले जाते. ते लोकप्रियतेपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य देत. त्यांच्या मते, प्रशासन हे शिस्त, वेग आणि निर्णयांवर चालते. त्यामुळेच त्यांना ‘कठोर पण कार्यक्षम प्रशासक’ अशी ओळख मिळाली होती. त्यांच्या कार्यशैलीवर टीका होत असली, तरी राज्याच्या प्रशासनात गती, शिस्त आणि विकासाचा दृष्टिकोन रुजवण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

भागा वरखडे