पुणे, १६ जानेवाली २०२३ : औरंगाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी कंपनीच्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून, आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी इथल्या या कंपनीमध्ये चटया बनविल्या जातात. आज सोमवारी (ता. १६) ही कंपनी चालू होती; तसेच कंपनीत काही कामगार देखील कामाला होते अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन वाहनांसह या ठिकाणी पाण्याचे टॅंकरदेखील आणले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या चारही बाजूंनी सोसायटी असून, एका घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील