तीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातील एकाला अटक

सोलापूर, ३ जानेवारी २०२३ : दारूबंदी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली. विजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलंग गुलाब तांबोळी (वय ३३, रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंदनगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर) या ठिकाणी ते भाड्याने राहतात. याविषयी अधिक माहिती अशी, की या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथे दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तक्रारदार यांना जामीन मिळविण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याच्या मोबदला म्हणून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती; परंतु तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर विजापूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी मलंग तांबोळी यास ताब्यात घेताना त्यांने धक्काबुक्की करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये लाचलुचपत विभागातील कर्मचरी जखमी झाला असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत विजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस नाईक प्रमोद पकाले या सर्वांनी मिळून ही कारवाई केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा