सोलापूर शहरातील आसरा भागात होणार नवे रेल्वेस्थानक

सोलापूर २४ जून २०२३: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे पुनर्विकास काम हाती घेण्यात आले आहे. ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत सोलापूर रेल्वेस्थानकासह कुर्डूवाडी ते कलबुर्गी दरम्यान मालवाहतूकीसाठी नवीन रेल्वेलाईन टाकण्यात येणार आहे. आसरा भागातील रेल्वेच्या जागेवर पुढील काळात नवीन रेल्वेस्थानक उभारण्यात येणार असुन, या स्थानकांवरुन कुर्डूवाडी ते कलबुर्गी दरम्यान लोकलसेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली.

सोलापूर शहराचा ‘स्मार्ट सिटी’ मध्ये समावेश करण्यात आलाय, त्यानुसार शहरातील अनेक भागात विकासाच्या दृष्टीने कामे सुरू आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून देखील विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली असून, देशभरातील रेल्वेस्थानकांचा विकास करणे, वंदे भारत, बुलेट ट्रेन यांसारख्या अत्याधुनिक-रेल्वेज प्रवाशांच्या सेवेसाठी देण्यात येत आहेत.

सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत स्थानकाचे विभाजन होणार आहे. यासाठी आसरा परिसरातील रेल्वेच्या जागेवर लवकरच नवीन रेल्वेस्थानक उभारण्यात येणार असुन, या ठिकाणाहून दोन लोकल रेल्वे धावणार आहे. यामुळे शहरातील जुळे-सोलापूर, आसरा, होटगी रोड, नई जिंदगी परिसरातील नागरिकांची उत्तमरीत्या सोय होईल, असे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा