आदिवासी जीवनावर आधारित समाजप्रबोधन करणारा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, २८ नोव्हेंबर २०२२ : विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जागतिक, सामाजिक, मानसिक या विषयांवर आधारित प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यातीलच एक उत्कृष्ट प्रयोग म्हणजे ‘गैरी’ हा चित्रपट. कलाकारांनी एकत्र येऊन मनोरंजनातून आदिवासी समाजाच्या समस्या मांडण्यासाठी ‘गैरी’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी तयार केला आहे.

‘गैरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आजच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या चित्रपटातून मांडली आहे. डॉक्टर होत असताना, त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमधून त्यातील रंजक कथेचा अंदाज येतो. आदिवासींच्या समस्या मांडतानाच मनोरंजनातून वास्तविक विषयाला हात घालणारा हा खुसखुशीत आणि अभिनयाची मेजवानी असणारा चित्रपट आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृत्तिका गायकवाड आणि देविका दप्तरदार हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

‘गैरी’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पांडुरंग बाबूराव जाधव यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे गीतलेखन गुरू ठाकूर आणि विष्णू थोरे यांनी केले आहे. त्याचबरोबर अमित राज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन व फुलवा खामकर यांचे नृत्य दिग्दर्शन या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तर वैशाली सामंत, अमित राज, मधुरा कुंभार, ऋषिकेश शेलार यांनी या चित्रपटातील गाणी गायिली आहेत. मयुरेश केळकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. युक्ता प्रॉडक्शन आणि द्विजराज फिल्म निर्मित ‘गैरी’ हा चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा