राजगुरूनगर, १४ मार्च २०२३ : किरकोळ भांडण, वादावादी झाल्यावर त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या एकाने भांडण झालेल्या व्यक्तीवर ब्लेडने वार केले. पोलिस ठाण्यात पोलिसांची नजर चुकवून झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या क्षीतेज बाबाजी दांडगे (रा. दोंदे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
जखमी आणि आरोपी दोंदे गावात शेजारी राहायला आहेत. जखमी क्षीतेजच्या घरासमोर वैभवची मुलगी गेली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत भांडणे होऊन त्यात जखमीने वैभवाच्या पत्नीला मारहाण केली होती. घडलेल्या या भांडणाची आज सकाळी पोलिसांत तक्रार द्यायला वैभव आला. पोलिसांनी क्षीतेज याला संपर्क करून बोलावून घेतले.
ठाण्यात एकत्र बसले असताना पोलिसांची नजर चुकवून वैभव बोराटे याने जवळ आणलेल्या धारदार ब्लेडने क्षीतेज याच्या गळ्यावर वार केला. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला बाजूला केले. अन्यथा पोलिस ठाण्यात दुर्दैवी घटना घडली असती. आरोपी वैभव हा शवविच्छेदन विभागातील कर्मचारी असून त्याच्याकडे धारदार ब्लेड होते, असे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर