राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली, २५ मार्च २०२३: राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व शिक्षेनंतर रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी देखील करण्यात आलीय. दरम्यान आज दुपारी एक वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होणार आहे.

“मोदी” आडनावावरून टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी केलाय. या कारवाईमुळं कॉंग्रेसमध्ये संतापाची लाट उसळलीय.

१४ विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध केलाय. ज्या दिवशी राहुल गांधी यांना दोषी सिद्ध करण्यात आलं, त्या दिवसापासून म्हणजे २३ मार्चपासून अपात्रतेचा निर्णय लागू होईल, असं लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलय. अपात्र ठरवण्यापूर्वी राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार होते. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावाच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा