मुंबई, 14 ऑक्टोंबर 2021: यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडिया सज्ज आहे. या जागतिक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा छोट्या स्वरूपाचा विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपली सुरुवात करेल. याआधी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाची नवीन जर्सी जाहीर केली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या धुरंदरांचा फोटो नवीन जर्सीमध्ये ट्वीट करून शेअर केलाय. पूर्वीप्रमाणेच ही जर्सी एमव्हीएल स्पोर्ट्सने लाँच केली आहे. बीसीसीआयने लिहिलंय की – “introducing…Billion Cheers Jersey! जर्सीचा पॅटर्न चाहत्यांकडून मिळणाऱ्या कोट्यवधी चीअरद्वारे प्रेरित आहे.”
भारतीय संघ सुरुवातीच्या 2007 टी -20 विश्वचषकात चॅम्पियन बनला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी उतरेल. कोहली शेवटच्या वेळी कर्णधार म्हणून टी -20 मध्ये प्रवेश करणार आहे.
आगामी स्पर्धा 2016 नंतरचा पहिला टी -20 विश्वचषक असेल. गेल्या वेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून जेतेपद पटकावलं होतं. भारताने सुपर -10 च्या गट सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. उपांत्य फेरीत भारताला विंडीजच्या हाती 7 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं.
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून टीम इंडियाचे सामने
भारताविरुद्धचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळले जातील. टी 20 विश्वचषक 2021 ची पहिली उपांत्य फेरी 10 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे खेळली जाईल. 11 नोव्हेंबर रोजी दुसरी उपांत्य फेरी आणि 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
2021 च्या टी -20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट -2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. क्वालिफायर फेरीनंतर, त्यात ब गटातील विजेत्या संघाचा आणि गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा समावेश असेल.
दुसरीकडं, गट 1 मध्ये वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. क्वालिफायर टप्प्यानंतर, गट अ चा विजेता संघ आणि गट ब चा उपविजेता संघ जोडला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे