नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२१: अफगाणिस्तानमधील अनियंत्रित परिस्थितीमध्ये भारताने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुमारे १२० भारतीयांसह काबूलहून उड्डाण केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन यांनाही भारतात परत आणण्यात आले आहे. हे विमान भारताच्या जामनगरमध्ये उतरले.
भारतीय हवाई दलाचे सी -१७ विमान मंगळवारी सकाळी काबूलहून निघाले होते. यामध्ये भारतीय दूतावासातील कर्मचारी, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांना परत आणण्यात आले आहे. गुजरातमधील जामनगरला पोहोचल्यावर या विमानाचे स्वागत करण्यात आले. अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांचे हार घालून स्वागत करण्यात आले, बसमध्ये बसून या नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या.
काबूल विमानतळावर आदल्या दिवशी बिघडलेल्या परिस्थितीनंतर विमानांचे ऑपरेशन थांबवण्यात आले. परंतु येथील परिस्थिती अमेरिकन लष्कराने नियंत्रणात आणली आणि आता विमानांचे संचालन सुरू झाले आहे, त्यानंतर भारतीय विमानेही येथून उड्डाण करण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो देखील समोर आले आहे, ज्यात विमानामधील तील भारतीय नागरिकांना परत आणले जात आहे. भारत सरकारने अफगाणिस्तानसाठी स्वतंत्र हेल्प डेस्कची स्थापना केली आहे.
याशिवाय भारताचे प्रयत्न तेथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा आहे. उत्तर प्रदेशातील सुमारे १५ ते २० कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकले आहेत, ज्यांनी भारत सरकारला त्यांना बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या मालकाने त्यांचे पासपोर्टही ठेवले आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतीय गृह मंत्रालयाने आता काही व्हिसा नियम शिथिल केले आहेत. अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी एक विशेष श्रेणी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना व्हिसा मिळवण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे